Logo

सोन्यातील गुंतवणूक किती लाभदायक

सोन्यातील गुंतवणूक

भारतीयांचं सोन्यावरील प्रेम जगप्रसिद्ध आहे. आपल्याकडे सोन्याला भरभराटीची एक खूण मानली जाते, आणि ग्रामीण भागात तर शक्य असेल तेव्हा सोने खरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. शहरी भागात देखील सणासुदीला लोक रांगा लावून सोने खरेदी करताना दिसतात. शतकानुशतके सर्वसामान्य भारतीयांची सोन्यावरची ही अढळ श्रद्धा, सोन्याला आपण दिलेलं धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थान, त्याविषयीचं आकर्षण हे जगभरातील गुंतवणूक, आर्थिक विश्वातील विश्लेषकांसाठी एक गूढमिश्रित कुतूहल बनून राहिलं आहे.

वार्षिक दरडोई राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या (per capita GDP) क्रमवारीत भारताचे स्थान जगातील पहिल्या १०० देशातही नाहीये, पण भारत सोन्याचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. जर एक गुंतवणूक म्हणून विचार करायचे ठरवले तर भारतीयांची सोन्यातील गुंतवणूक ही वर्षानुवर्षं आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींपेक्षा कित्येक पट अधिक राहिली आहे. देशांतर्गत मागणी पुरवण्यासाठी २०१८ वर्षात भारताने सुमारे रू २.३ लाख कोटी किमतीचे सोने आयात केले. त्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवली गेलेली रक्कम सुमारे रू १.२ लाख कोटी होती.

मात्र, ‘गुंतवणूक, गुंतवणूक’ म्हणून कितीही म्हटले तरी आपली सोनेखरेदी नेहेमीच भावनिक मुद्द्यांवर होत असते. आर्थिक गुंतवणूक आपण अशा गोष्टीत केली पाहिजे की ज्यांना स्वतःची अन्तःस्थ उत्पादकता आहे, ज्यातून उत्पन्न आणि त्यायोगे परतावा मिळू शकतो. त्या दृष्टीने सोने पूर्णपणे निरुपयोगी आहे. त्यातून लाभांश, व्याज किंवा भाडं अशा प्रकारचा कुठलाच परतावा मिळत नाही. जर दुसरं कोणीतरी त्यासाठी भविष्यात जास्त किंमत मोजायला तयार झालं तरच मूळ गुंतवणूकदाराला काही परतावा मिळू शकतो.

जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी सोने एक गुंतवणूक म्हणून निरुपयोगी कसे याचे सोप्या शब्दात विवेचन केले आहे. समजा आपण जगातील सगळेच्या सगळे १७०,००० टन सोने एकत्र केले आणि वितळवून त्याचा एकच ठोकळा बनवला तर ६८ फुट X ६८ फुट X ६८ फुट अशा मापाचा घन तयार होईल. विद्यमान किमतीप्रमाणे त्याची किंमत तब्बल $९-९.५ लाख कोटी (१ ट्रीलियन = १ लाख कोटी) एवढी प्रचंड होईल. त्याला जर आपण ‘अनाव दिलं आणि दुसऱ्या बाजूला आपण ‘बनावाच्या तेवढ्याच किमतीच्या इतर गुंतवणुकी ठेवल्या – त्यात भारतातील सर्व सुचीकृत कंपन्या (एकत्रित बाजारमूल्य $२-२.२५ लाख कोटी), अधिक सर्व सरकारी कर्जरोखे (सुमारे $२ लाख कोटी), अधिक ७०-७५ कोटी एकर शेतजमीन (सरासारी सुमारे रू ५ लाख प्रतिएकर भावाने) येतील. आता एक गुंतवणूकदार म्हणून एखाद्याने ‘अआणि ‘बपैकी कुठला गुंतवणूक पर्याय निवडावा?

जो कोणी ‘अपर्याय निवडेल त्याला एक सुंदर, चकाकणारा, एकमेवाद्वितीय असा मोठ्ठा सोन्याचा ठोकळा मिळेल. पण केवळ बघत बसण्यापलीकडे त्याचा काही उपयोग असेल का? अजिबात नाही. याउलट जो ‘बपर्याय निवडेल त्याला दरवर्षी शेअर्स वरील लाभांश, कर्जरोख्यांवरील व्याज आणि शेतजमिनीतून लाखो टन शेतीमालाचे उत्पादन अशा स्वरुपात हजारो कोटींचा परतावा मिळत राहिल. अशा वेळी कोणी तरी शहाणा गुंतवणूकदार ‘अपर्याय स्वीकारेल का?

सोनं हे मूलतः अनुत्पादक असल्यामुळे त्याच्या वर्षानुवर्षं केलेल्या साठवणूकीतून दीर्घकालीन परतावा चांगला मिळत नाही. १९८० साली १ ग्रॅम सोन्याची किंमत होती रू १००, जी आता रू ३००० पेक्षा जास्त आहे. म्हणजेच ३० पट झाली, ज्याचा वार्षिक सरासरी परतावा होतो ९.१%. त्या उलट १९८०साली १०० ला असलेला सेन्सेक्स आता ३८,००० च्या पार गेलाय – म्हणजेच ३८० पट वृद्धी, ज्याचा वार्षिक सरासरी परतावा होतो तब्बल १६.५%!

गमतीची गोष्ट अशी आहे की ह्याच ४० वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकन डॉलरमधील सोन्याची किंमत केवळ ३.५-४ पटच वाढली आहे. पण मग भारतीय रुपयातील सोन्याच्या किमतीत ३० पट वाढ कशी झाली? तर ती झाली रुपयाच्या अवमुल्यनामुळे. १९८० साली एका डॉलरसाठी सुमारे रू ७.५-८ असलेला विनिमयदर आता रू ६८-६९ झाला आहे. त्याच जोडीला काही वर्षांपूर्वी सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने लावलेला कर आणि स्थानिक बाजारातील काही त्रुटी यामुळेदेखील सोन्याच्या रुपयातील किमती वाढलेल्या दिसतात.

रुपयाचे अवमूल्यन होण्याची अनेक कारणे आहेत, परंतु त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट. आपली आयात कायमच निर्यातीपेक्षा जास्त असत आलेली आहे. आणि व्यापारी तुटीच्या कारणांमध्ये जरी खनिज पेट्रोलियम तेलाच्या आयातीचा क्रमांक पहिला असला तरी दुसरा क्रमांक हा सोन्याच्या आयातीचा लागतो. म्हणजेच, जर आपण सोन्याची आयात पूर्णपणे थांबवू शकलो, तर आपली व्यापारी तूट भरून निघेल आणि रुपयाची घसरण थांबेल. आणि जर रुपया वधारायला लागला तर देशांतर्गत सोन्याच्या किमती घटायला लागतील. मग कोणाला गुंतवणूक म्हणून सोने घ्यायचा प्रसंगच येणार नाही.

म्हणजेच आपली सोनेखरेदी केवळ आपले पैसे निरुत्पादक ठिकाणी अडकवून टाकते असे नाही, तर संपूर्ण देशाचे अर्थकारण देखील हलवून टाकते.

सोने हे मुळात अनुत्पादक असल्यामुळे परतावा देऊ शकत नाही आणि एक गुंतवणूक म्हणून त्याचा विचार करणे चुकीचे आहे. मात्र तरीसुद्धा असंख्य लोकांना त्यात ‘गुंतवणूककरायचीच असते. अशा वेळी कसा दृष्टीकोन ठेवला पाहिजे, कुठल्या पर्यायांना प्राधान्य दिले पाहिजे आणि का, ह्या गोष्टींचा उहापोह आपण पुढील लेखात करू.

 

---- प्राजक्ता कशेळकर